नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शेअर मार्केट रॅकेटचे धागेदोरे संपूर्ण राज्यभर पसरलेले असून सर्वसामान्य नागरिकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर एमपीआयडी कायदा अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांनी केलेली आहे.
शेवगाव तालुक्यात अनेक जण शेअर मार्केट ट्रेडिंगच्या विळख्यात अडकून देशोधडीला लागलेले आहेत. अनेक जणांवर या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झालेले आहेत पण तरीही फसवणूक झालेल्या व्यक्तींना त्यांची रक्कम मिळालेली नाही. शेवगाव पोलीस ठाण्याच्या आवारात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.
शेअर मार्केट ट्रेडिंग करून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात एमपीआयडी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी प्यारेलाल शेख , गहिनीनाथ काकडे , रामेश्वर शेळके तसेच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.