मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा बांधवांचा झंझावात आज नगर शहरांमध्ये पहायला मिळणार असून जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तब्बल 500 पोलिसांचा बंदोबस्त या रॅलीसाठी तैनात करण्यात आलेला असून दोन हजार स्वयंसेवक देखील शांतता रॅलीच्या मदत कार्यात सहभागी झालेले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली शहरातील इम्पेरियल चौक , माळीवाडा , पांचपीर चावडी तख्ती दरवाजा, माणिक चौक , कापड बाजार , तेलीखुंट , चितळे रोड आणि चौपाटी कारंजा या मार्गाने जाणार असून शांतता रॅलीसाठी जय्यत तयारी शहरात करण्यात आलेली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी या निमित्ताने वाहतूक विस्कळीत झाल्याचे चित्र असून शाळांना यापूर्वीच सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . माळीवाडा बस स्टँड येथील चौकात छत्रपती शिवाजी महाराज आणि मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची सुरुवात होणार असून चौपाटी कारंजा इथे रॅलीचा समारोप होणार आहे.
मराठा बांधवांमध्ये आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असून मराठा बांधवांकडून त्यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा नगरमध्ये दाखल झालेला होता त्यावेळी केडगावमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
नगर शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे कट आउट लावण्यात आलेले असून त्यांच्या रॅलीत समाजात समाज बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी सुमारे दोन हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उपस्थित राहू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे.