मोठी बातमी.. टेलिग्राम ऍपचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक

शेअर करा

टेलिग्राम मॅसेजिंग ऍपचे संस्थापक आणि सीईओ पावेल डुरोव यांना काही तासांपूर्वी अटक करण्यात आली आहे. फ्रान्समधील विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. शनिवार २४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी पॅरिसच्या जवळील बॉर्गेट विमानतळावर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते स्वतःच्या खासगी जेटने पॅरिस येथे आले होते.

टेलिग्राम मॅसेजिंग ऍपचे संस्थापक पावेल डुरोव हे अजरबैजानमधून फ्रान्समध्ये पोहचले होते. त्यांच्या या अटकेवर टेलिग्रामने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. डुरोव हे दुबईत स्थायिक झाले आहेत. ते मुळचे रशियन आहेत. कुठल्याही पद्धतीने युजर्सच्या प्रायव्हसीसोबत  तडजोड करणार नाही असे कारण देत त्यांनी २०१४ मध्येच रशिया सोडला होता. फ्रान्स मीडियानुसार, डुरोव यांना टेलिग्राम ऍप संबंधी एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कथितरित्या मनी लॉण्डरिंग, ड्रग्स तस्कारी आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंदर्भातील व्हिडीओ शेअर करण्यासाठी केला जात होता असा त्यांच्यावर आरोप आहे. अटक वॉरंट जारी झाल्यापासून ते फ्रान्स आणि युरोपमध्ये जाणे टाळत होते.

सध्या टेलिग्रामवर जगभरात ९०० दशलक्ष सक्रिय वापरकर्ते असून अटकेनंतर रशियातील ब्लॉगर्सने रविवार दुपारी फ्रान्सच्या दुतावासासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे. फ्रान्स डुरोव यांच्यावर दडपण आणत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. २०२२ मध्ये रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यापासून दोन्ही देशांमध्ये या ऍपचा वापर वाढला आहे . राजकीय आणि सैन्य हालचालींसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि त्यांच्या अधिकाऱ्यांमधील संवादाचे हे प्रभावी माध्यम आहे. आता त्यांना ऍपद्वारे होणारी गुन्हेगारी रोखण्यास अपयश आल्याने अटक करण्यात आली आहे.


शेअर करा