एकीकडे खराब रस्ते बंद पथदिवे बेरोजगारी अन दुसरीकडे अदा शर्मा अन तिचे कार्यकर्ते

शेअर करा

नगर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली असताना एका लोकप्रतिनिधीच्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी शहरात दहीहंडीचे आयोजन केलेले आहे. दहीहंडीचे आयोजन करण्यासाठी शहरातील आधीच अरुंद रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्टेजची उभारणी करण्यात आलेली असून संपूर्ण शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी देखील करण्यात आलेली आहे त्याने देखील शहराचे विद्रूपीकरण झालेले असून महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईस धजावत नसल्याचे चित्र आहे. 

नगर शहरातील बेरोजगार तरुणांना हाताला काम देण्यापेक्षा असे फेस्टिवल आयोजन अधिक सोपे असल्या कारणाने गेल्या काही वर्षांपासून विविध राजकीय नेत्यांनी किरकोळ सणाचे आधी सामाजिकीकरण आणि त्या पाठोपाठ झुंडशाहीत रुपांतर केलेले आहे. वाढीव डीजे मुळे नागरिकांना त्रास होतो त्याचे सालाबाद प्रमाणे गुन्हे दाखल होतात मात्र पोलीस स्टेशन सध्या अशा गुन्ह्यांसाठी केवळ पब्लिसिटी स्टेशन बनली आहेत आणि उर्वरित कसर मीडिया भरून काढतोय..

गेल्या कित्येक वर्षांपासून नगर शहरात एकही मोठी कंपनी आलेली नाही उलट आहे त्या त्या कंपन्याच संकटात सापडलेल्या आहेत.  नगर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा पाहता आणि येथील कंपन्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये राजकीय लुडबुड पाहता कंपन्या नगरला येण्यास धजावत नाहीत. आयटी पार्कच्या कंपन्यांची पोलखोल काँग्रेस नेते किरण काळे यांनी केल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यापर्यंत प्रकरण गेलेले होते त्यातही कुठले तथ्य तपासात आढळून आलेले नाही. 

सद्य परिस्थितीत शहरातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून एकीकडे बेरोजगार तरुण कामाच्या शोधात असताना त्यांना फेस्टिवलमध्ये अडकून ठेवण्यात राजकीय नेते आणि त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सध्या तरी यशस्वी ठरत आहेत. नगर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा, राजकीय नेत्यांनी केलेली फ्लेक्सबाजी , शहरातील बेरोजगारीचे प्रमाण , रात्रीच्या वेळी बंद पथदिवे आणि त्यामुळे शहरातील वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना याने नगरकर त्रस्त असताना लोकप्रतिनिधी जनतेला काय संदेश देत आहेत याचाही विचार जनतेने करण्याची गरज आहे.


शेअर करा