सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 26 ऑगस्ट पासून अहमदनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.आज उपोषणाचा चौथा दिवस असून अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही तर दुसरीकडे आमरण उपोषण करणाऱ्या तीनही व्यक्तींची आज प्रकृती खालावलेली दिसून येत आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी उपोषणकर्त्या व्यक्तींची आणि आंदोलकांची भेट घेतली आणि त्यानंतर वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला मात्र अद्यापपर्यंत राज्य सरकारकडून कुठलाही निर्णय झालेला नसल्याकारणाने हे आमरण उपोषण आजही सुरू आहे.
महापालिका युनियन कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , ‘ केंद्र सरकारने 2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू केले त्यानंतर या शिफारशी राज्याने स्वीकारल्या आणि त्यानंतर राज्य शासनाच्या तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या.
सदर प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्र व्यवहार केला मात्र अद्यापही सातव्या वेतन आयोगाचे लाभ महापालिका कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.
२ ऑक्टोबर 2023 रोजी शहरातून मंत्रालयापर्यंत असा पायी लॉन्ग मार्च काढण्यात आलेला होता मात्र भाळवणी इथे हा लॉन्ग मार्च पोहोचला असता कामगार युनियनला पत्र देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने हा लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला मात्र त्यानंतर पुन्हा सातव्या वेतन आयोगाबद्दल कुठला निर्णय झाला नाही असा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे.
अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल आणि कार्याध्यक्ष बाबासाहेब राशिनकर यांनी अखेर आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. महापालिका कामगार युनियनचे आंदोलन हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे सुरू झालेले असून जोपर्यंत अहमदनगर महापालिकेतील कायम कर्मचारी आणि अधिकारी यांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येणार नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे असे युनियनच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.