राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावर जमा झाले की तात्काळ त्यातून मिनिमम अकाऊंट बॅलन्स , एसएमएस चार्ज, थकीत कर्ज वसुली या कारणाखाली परस्पर पैसे वजा केले जात आहेत. अनेक महिलांच्या हातात यामुळे सरकारची रक्कम हाती येत नसून केवळ बँकेची तिजोरी भरली जात आहे.
आत्तापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली असून अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे. अनेकदा महिलांची खाती ही अपडेटेड नसल्या कारणाने दरवर्षी त्यातून एसएमएस चार्ज , मिनिमम बॅलन्स यावरून थकीत रक्कम आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे आले की ही रक्कम त्यातून लगेच वजा केली जात आहे .
बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ,’ बँकेचे नियम आहेत. बँकेच्या सॉफ्टवेअरमध्येच तशी सिस्टीम असल्याकारणाने आपोआप पैसे वजा होतात आम्ही स्वतःहून काही पैसे वजा करत नाही ,’ असे सांगितले आहे तर महिलांच्या खात्यात सरकारकडून येणारी रक्कम जशीच्या तशी हातात येत नसल्याने महिलांमध्ये याविषयी नाराजी पाहायला मिळत आहे.