नववा दिवस..उपोषणकर्त्या व्यक्तींची संख्या वाढली , मनपा कर्मचारी आक्रमक

शेअर करा

सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 26 ऑगस्ट पासून अहमदनगर महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांकडून महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे.आज उपोषणाचा नववा दिवस असून तीन कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणखीन दोन कर्मचाऱ्यांनी आजपासून  त्यांच्यासोबत उपोषणाला सुरुवात केलेली आहे.  याआधी उपोषण सुरू केलेल्या तीनही व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून आमदार संग्राम जगताप यांच्या विनंतीनंतर त्यांनी सलाईन घेण्यास संमती दर्शवली आहे. आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका कर्मचारी युनियनने दिलेला आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यापूर्वीच आम आदमी पार्टीने तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी उपोषणकर्त्या व्यक्तींची आणि आंदोलकांची भेट घेतली आणि त्यानंतर वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला मात्र अद्यापपर्यंत  राज्य सरकारकडून कुठलाही निर्णय झालेला नसल्याकारणाने हे आमरण उपोषण आजही सुरू आहे. आगामी काळात आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. 

महापालिका युनियन कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , ‘ केंद्र सरकारने  2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू केले त्यानंतर या शिफारशी राज्याने स्वीकारल्या आणि त्यानंतर राज्य शासनाच्या तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. 

सदर प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्र व्यवहार केला मात्र अद्यापही सातव्या वेतन आयोगाचे लाभ महापालिका कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे.  २ ऑक्टोबर 2023 रोजी शहरातून मंत्रालयापर्यंत असा पायी लॉन्ग मार्च काढण्यात आलेला होता मात्र भाळवणी इथे हा लॉन्ग मार्च पोहोचला असता कामगार युनियनला पत्र देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने हा लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला मात्र त्यानंतर पुन्हा सातव्या वेतन आयोगाबद्दल कुठला निर्णय झाला नाही असा आरोप युनियनकडून करण्यात आला आहे. 

अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल , कार्याध्यक्ष बाबासाहेब राशिनकर , नंदकुमार नेमाने , अजय सौदे यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे. महापालिका कामगार युनियनचे आंदोलन हे शासनाच्या नाकर्तेपणामुळे सुरू झालेले असून जोपर्यंत अहमदनगर महापालिकेतील कायम कर्मचारी आणि अधिकारी यांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येणार नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे असे युनियनच्या वतीने सांगण्यात आलेले आहे. 


शेअर करा