उत्तर प्रदेशसोबत भाजपशासित राज्यात गुन्हा केला किंवा आरोपी ठरला म्हणून तात्काळ त्याच्या घरावर बुलडोझर चालवण्याचा प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेला आहे . कायदेशीर प्रक्रिया न राबवता एखाद्याचे घर तोडणे यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलेली असून केवळ एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून तिचे घर कसे पाडले जाऊ शकते ? असा खडा सवाल विचारलेला आहे . आम्ही यासाठी राष्ट्रव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी करू असे देखील सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे.
उदयपूर इथे एका मुस्लिम विद्यार्थ्यांने हिंदू विद्यार्थ्यांची हत्या केलेली होती त्यानंतर शहरात जातीय दंगल उसळली आणि जिल्हा प्रशासनाने मुस्लिम विद्यार्थी जिथे राहत होता तिथे भाड्याचे असलेले घर तोडून टाकलेले होते त्यानंतर सदर आरोपी आणि इतर काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केलेली होती. इतरही काही याचिका अशाच संदर्भात असून त्यावर एकत्रित सुनावणी सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी ,’ गुन्ह्याच्या प्रकरणात एखादा व्यक्ती दोषी असेल तर तरीसुद्धा कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्याशिवाय त्याच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही. सार्वजनिक मालकीच्या जागेवरील बेकायदा अतिक्रमणाला आम्ही संरक्षण देणार नाही मात्र केवळ गुन्ह्यात सहभाग आहे म्हणून त्याची स्थावर मालमत्ता पाडली जाऊ शकत नाही ,’ असे म्हटलेले आहे.