नगरमध्ये मनसेत कोणतेच गटतट नाहीत , अंतर्गत धुसफूस असल्याचे वृत्त फेटाळले

शेअर करा

आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार हे जवळपास स्पष्ट असून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील महाराष्ट्रभर दौऱ्यास सुरुवात केलेली आहे. आज चार तारखेला अमित ठाकरे हे नगर शहरात येणार असून त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेली आहे. 

अमित ठाकरे आज विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या भेटी घेणार असल्याचा अंदाज असून विद्यार्थी सेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील यावेळी केल्या जाणार आहेत. नगर शहर विधानसभा मतदारसंघात मनसेमध्ये किरकोळ धुसफूस असल्याची माध्यमात चर्चा असताना मनसेचे प्रमुख संघटक महाराष्ट्र राज्य ऍडव्होकेट दीपक शर्मा व नगर शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर यांनी पक्षात कोणतेही गटतट असल्याचे वृत्त फेटाळलेले आहे . 

गजेंद्र राशिनकर यांनी नगर चौफेर प्रतिनिधीसोबत बोलताना ,’ मनसेत किरकोळ धुसफूस असल्याच्या चर्चेत काहीही तथ्य नाही. वरिष्ठ पातळीवर जो काही निर्णय होईल त्याचे सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालन करतील. नगर शहर मनसेमध्ये कुठलेही गटतट नाहीत ‘ असे म्हटलेले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत दोनशेपेक्षा जास्त जागा लढवण्याची तयारी केलेली असून अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात मनसेकडून सध्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. अमित ठाकरे नगर शहरात आज दौऱ्यावर येणार असून त्यानंतर नगर शहरात मनसे मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.


शेअर करा