आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नांना यश , मनपाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर मागे 

शेअर करा

महापालिका कर्मचारी गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आलेली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनपाच्या सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावावर सही झाल्यानंतर महापालिका कार्यालयासमोरील उपोषण मागे घेण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी लवकरच जीआर काढण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे. आमदार संग्राम जगताप यांनी याप्रकरणी महापालिका कर्मचाऱ्यांच्या व्यथा वरिष्ठ पातळीवर पोहोचवल्यानंतर अखेर हा निर्णय झालेला आहे . 

सातव्या वेतन आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी 26 ऑगस्टपासून अहमदनगर महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांकडून महापालिका कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली होती .आमदार संग्राम जगताप यांच्या विनंतीनंतर उपोषणकर्त्या व्यक्तींनी सलाईन घेण्यास संमती दर्शवली होती मात्र वरिष्ठ पातळीवर संग्राम जगताप यांच्या वतीने आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यापूर्वीच आम आदमी पार्टीने तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला होता. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी उपोषणकर्त्या व्यक्तींची आणि आंदोलकांची भेट घेतली आणि त्यानंतर वरिष्ठांना तसा अहवाल सादर केला मात्र राज्य सरकारकडून कुठलाही निर्णय झालेला नसल्याकारणाने हे आमरण उपोषण सुरूच होते . 

महापालिका युनियन कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , ‘ केंद्र सरकारने  2016 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे लाभ सुरू केले त्यानंतर या शिफारशी राज्याने स्वीकारल्या आणि त्यानंतर राज्य शासनाच्या तसेच निमशासकीय कर्मचाऱ्यांना देखील 2016 पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या. 

सदर प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्र व्यवहार केला मात्र अद्यापही सातव्या वेतन आयोगाचे लाभ महापालिका कर्मचाऱ्यांना मिळत नव्हते . २ ऑक्टोबर 2023 रोजी शहरातून मंत्रालयापर्यंत असा पायी लॉन्ग मार्च काढण्यात आलेला होता मात्र भाळवणी इथे हा लॉन्ग मार्च पोहोचला असता कामगार युनियनला पत्र देऊन आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने हा लॉन्ग मार्च स्थगित करण्यात आला होता मात्र त्यानंतर पुन्हा सातव्या वेतन आयोगाबद्दल कुठला निर्णय झाला नाही ‘ त्यामुळे या आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली होती. 

अहमदनगर महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल , कार्याध्यक्ष बाबासाहेब राशिनकर , नंदकुमार नेमाने , अजय सौदे यांनी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला होता . अहमदनगर महापालिकेतील कायम कर्मचारी आणि अधिकारी यांना तात्काळ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी लागू करण्यात येणार नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे असे युनियनच्या वतीने सांगण्यात आलेले होते.  


शेअर करा