‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगली जिल्ह्यात बोलताना केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो हा त्यांचा अपमान आहे. नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली मात्र त्यांनी संबंध महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीची माफी मागायला हवी ,’ असे राहुल गांधींनी म्हटलेले आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेल्या माफीत देखील अहंकार असल्याचे म्हटले होते.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव इथे पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या आणि स्मारकाच्या कामाचे कामाच्या उद्घाटनासाठी राहुल गांधी आलेले होते. राहुल गांधी म्हणाले की ,’ जो चुकतो तो माफी मागतो. मोदींनी शिवरायांची माफी मागितली. पुतळा उभारणीचा ठेका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला दिला म्हणून ही माफी मागितली का ? हे काम गुणवत्तेवर द्यायला हवे होते हे त्यांना मान्य आहे का ? पुतळा बनवताना भ्रष्टाचार झाला चोरी झाली म्हणून माफी मागता का ? हा सर्वात मोठ्या महापुरुषांचा अवमान आहे.’
राहुल गांधी पुढे म्हणाले की ,’ छत्रपती शिवाजी महाराज , शाहू महाराज , महात्मा फुले , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जीवनमूल्य शिकवली आणि प्रगतीचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेस विचारधारेचा आहे. आधी राजकारण चालत होते आता देशात विचारधारेचे युद्ध चालू आहे. काँग्रेसची विचारधारा एकीकडे तर दुसरीकडे भाजपची मोजक्या लोकांच्या विकासाचा अजेंडा चालवणारी विचारधारा आहे. जाती व्यवस्था कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे ,’ असे देखील राहुल गांधी पुढे म्हणाले.