गणेश भक्तांच्या उत्साहात तसूभरही कमतरता नाही ,  नेत्यांना बाप्पा पावणार का ? 

शेअर करा

दर पंधरा-वीस मिनिटांनी येणारा पाऊस आणि खड्ड्यातून शोधावा लागणारा रस्ता अशी नगर शहरातील परिस्थिती असली तरी नगर शहरात गणेश भक्तांच्या उत्साहात तसूभरही कमतरता जाणवत नाही. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठा फुललेल्या असून श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करत आहेत. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत श्री गणेशाच्या मूर्तीच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झालेली असली तरी भाविकांचा कल हा इको फ्रेंडली मूर्ती घेण्याकडे दिसून येत आहे. शहरातील प्रोफेसर कॉलनीसहित इतर उपनगरात देखील चौकाचौकात गणेश मूर्तीच्या विक्रीचे स्टॉल लावण्यात आलेले असून पूजेचे इतर साहित्य देखील या स्टॉलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

पूर्वीसारखी वर्गणी गोळा करून मग गणेश उत्सव साजरा करण्याची पद्धत काहीशी कालबाह्य झालेली असून सध्या बहुतांश चौका चौकात काही ठराविक नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी गणेशोत्सवाचे मंडप उभारलेले आहेत तर त्यांच्या नेत्यांचे फोटो आणि होर्डिंग मंडपाच्या अवतीभवती लावण्यात आलेली आहेत. आगामी निवडणुकीत या नेत्यांना गणपती बाप्पा पावणार का हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.


शेअर करा