उद्याचा दिवस नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा

शेअर करा

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणी आतापर्यंत अनेक आरोपी गजाआड झालेले असले तरी ठेवीदारांना त्यांची संपूर्ण रक्कम अद्यापही मिळालेली नाही. नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवींची रक्कम मिळवण्यासाठी ठेवीदार गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष करत असून नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तथा कर्जदार प्रवीण लहारे आणि अविनाश वैकर यांच्या जामीन अर्जावर नऊ तारखेला सुनावणी आहे. उद्याचा दिवस नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे . 

नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध असून याच केस संदर्भात फॉरेन्सिक ऑडिटची काही पाने सोशल मीडियावर एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये व्हायरल झालेली होती. पोलीस यंत्रणेने वास्तविक फॉरेन्सिक रिपोर्ट न्यायालयात सादर करणे गरजेचे होते मात्र त्याआधीच ही पाने व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने देखील याप्रकरणी चौकशी अहवालाचे आदेश दिलेले होते. हा अहवाल देखील उद्या न्यायालयात सादर होणे अपेक्षित आहे . 

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य पाच आरोपी हे रक्षाबंधनाचे निमित्त साधून नगर शहरात आल्याची कुणकुण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना लागली आणि पोलिसांना देखील याप्रकरणी माहिती मिळाली मात्र काही मिनिटांच्या आत गोपनीयरित्या पाचही आरोपी गायब झालेले होते. 

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरण सुमारे 291 कोटी रुपयांचे असून या प्रकरणात दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे कुटुंबीय हे मुख्य आरोपी आहेत. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात बँके गेल्यानंतर इतर संचालकांनी गांधी यांच्यासोबत मिळून मोठ्या प्रमाणात अपहार केला त्यामुळे ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही आणि त्यानंतर बँकेवर अवसायकाची नेमणूक करण्यात आली. 

पोलीस प्रशासनावर या प्रकरणात मोठ्या प्रमाणात दबाव असून अनेक दिग्गज व्यक्तींचे हात दगडाखाली अडकले असल्याकारणाने ठेवीदारांना अपेक्षित असा दिलासा देण्यास आतापर्यंत प्रशासन अपयशी ठरलेले आहे. काही मोहरे पोलिसांनी ताब्यात घेतलेले असून सध्या ते जेलमध्ये असले तरी मुख्य आरोपींना हात लावण्याची पोलिसांची अद्यापही हिम्मत झालेली नाही. मुख्य आरोपी जोपर्यंत ताब्यात येणार नाही तोपर्यंत भुई धोपटण्याचाच प्रकार सध्या आर्थिक गुन्हे शाखा करत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


शेअर करा