नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘ ऑडिओ क्लिप ‘ व्हायरल, हफ्तेखोरी व मीटरची पोलिसांची चर्चा आली बाहेर

  • by

अकोले व राजुर या दोन पोलीस स्टेशन हद्दीत गोमांस वाहतूक आणि वाळू तस्करी संदर्भात ऑडिओ क्लिप सध्या परिसरातील व्हाट्सअप ग्रुप वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पोलीस घेत असलेला ‘ हप्ता ‘ म्हणजे अवैध व्यवसाय सुरू ठेवण्याचे ‘ मिटर ‘ याची जोरदार चर्चा सध्या दिवाळीच्या सुमारास परिसरात सुरू आहे. पोलिसांच्या हप्तेखोरीचे साखळी रॅकेट अकोले पोलिसांच्या दुहीमुळे समाजापुढे आले आहे. पोलिसांनीच केलेली पोलिसांची पोल-खोल ह्या सोशल मीडियात चर्चेचा विषय झाला आहे.

राजूर पोलीस सहायक निरीक्षक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर अकोलेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी याबद्दल प्रतिक्रिया देणे टाळले आहे . पोलीस कर्मचाऱ्यांनी गोमांस वाहतूक करणारा टेम्पो पकडला होता. हा टेम्पो सोडून देण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक व अवैध व्यवसायाचे हप्ते वसूल करणारा पोलिस यांच्याबरोबर झालेल्या संवादाचा हा ऑडिओ आहे.

‘ तुमचा निर्णय घेणार का ? ‘ ‘ काही कमी जास्त झाले तर तुम्ही निस्तरा ‘ ‘ गाडीत गोमांस मिळाले नाही असा रिपोर्ट द्या ‘ अशा आशयाचा या ध्वनिफितीत संवाद असल्याचे दिसते. तेरा महिन्यांपूर्वीची ही क्लिप आत्ताच व्हायरल का झाली ? याबद्दल मात्र काही ठोस कारण पुढे आलेले नाही मात्र पोलिसांच्या दुहीमुळे तालुक्यांत असलेली हप्ते खोरी यामुळे ही क्लिप व्हायरल करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे.

वाळू तस्करी करणाऱ्याने दोन वाहन चालक, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे मीटर पूर्ण करण्यासाठी २७ हजार व १७ हजार रुपये दिल्याचे बोलणे देखील आहे. मोठ्या खुबीने रेकॉर्ड केलेला हा हफ्तेखोरी व मीटरचा क्लिअर संवाद व्हायरल झाला आहे. पोलिसांनीच पोलिसांचे वाभाडे काढले असून अकोले तालुका पोलिस प्रशासनास आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे.अकोल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी मात्र या प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगत क्लिप मधील चर्चेत आलेले पोलीस सचिन शिंदे यांच्या फिर्यादीवरून ध्वनिफीत व्हायरल करणाऱ्या संबंधितांविरुद्ध अब्रु नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.