नगर शहरात खंडित होणारा वीज पुरवठा व्यावसायिकासाठी अत्यंत अडचणीचा ठरत असून त्यामुळे अचानक होल्टेज वाढल्यानंतर शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रमाण शहरात वाढलेले आहे. नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकाजवळ समर्थ शाळेच्या बाजूला असलेल्या कुमठेकर बॅग हाऊसमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर सकाळी दुकानाचे मालक यांनी दुकान उघडले त्यावेळी दुकानातील सर्व माल जळून भस्मसात झालेला होता.
दुकान मालक श्री कुमठेकर यांनी नगर चौफेर प्रतिनिधी सोबत बोलताना ,’ रात्री दुकान बंद केले त्यावेळी सर्व काही व्यवस्थित होते. शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग लागली असावी आणि त्यानंतर दुकानातील सर्व माल जळून भस्मसात झाला आहे ,’ असे सांगितलेले आहे.
नगर शहरात ठिकठिकाणी उन्हाळ्यात आग लागून दुकानांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढलेले आहे मात्र पावसाळ्यात देखील अशी घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. श्री कुमठेकर यांच्या दुकानाला आग लागली त्यावेळी दुकानात कोणी नव्हते म्हणून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र दुकानातील लाखो रुपयांच्या बॅग व इतर व्यावसायिक साहित्य जळून भस्मसात झालेले आहे.