नगर शहरांमध्ये रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे . पावसाळ्याचे भान न ठेवता सुरू करण्यात आलेली विकासकामे नगरकरांसाठी प्रचंड अडचणीची ठरत आहेत . शहरातील अनेक व्यावसायिकांवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत असून अशातच नगरमध्ये भररस्त्यात मोकाट जनावरांचा उच्छाद सुरु आहे.
गणेशोत्सव सुरू असल्याकारणाने अनेक नागरिकांची सध्या शहरात वर्दळ वाढलेली आहे मात्र आधीच खड्डे करून ठेवलेले रस्ते त्यातून मार्ग काढून नगरकर चालत असताना रस्त्यावरील मोकाट जनावरे कुठल्याही क्षणी अंगावर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या जनावरांमधील झुंजीमुळे वाहनांचे देखील नुकसान घडत असून महापालिका प्रशासनाला ही जबाबदारी आपली आहे याचे भान राहिलेले नाही.
महापालिकेचा कोंडवाडा विभाग नक्की कुणासाठी कार्यरत आहे असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे. शहरातील जनावरांचे काही मालक सकाळच्या वेळी भर रस्त्यात जनावरे सोडून निघून जातात आणि दिवसभर चरल्यानंतर संध्याकाळी त्यांना घरी घेऊन जातात अशा वेळी अपघात झाला तर जबाबदारी नक्की कुणाची असा प्रश्न उपस्थित होत असून अशा मालकांवर देखील कठोर कारवाईची गरज आहे. भर रस्त्यात जनावरे सोडून नागरिकांच्या अपघाताला निमंत्रण देण्याचा अधिकार या मोकाट जनावरांच्या मालकांना कुणी दिला ? असा देखील प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.