नगर अर्बन बँक कर्ज व्यवहार प्रकरणात अनेक आरोपी गजाआड झालेले असले तरी ठेवीदारांना मात्र अद्यापपर्यंत ठेवीची संपूर्ण रक्कम परत मिळालेली नाही. कर्ज थकवणाऱ्या कर्जदारांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखा आक्रमक झालेली असून तब्बल 44 कोटी रुपयांचे कर्ज थकवणाऱ्याला प्रोफेसर कॉलनी चौकातून ताब्यात घेतले आहे. त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार , केशव भाऊसाहेब काळे ( वय पन्नास वर्ष राहणार सारोळा कासार तालुका नगर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून आरोपी एका विद्युत कंपनीचा संचालक आहे. अर्बन बँकेतून त्याने तब्बल 44 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले होते आणि या कर्जातून त्याने याच घोटाळ्याशी संबंधित इतर व्यक्ती मयूर शेटीया , विजय मर्दा , श्री गणेश एजन्सी , मुकुंद जोशी तसेच इतर काही व्यक्तींच्या नावावर मोठ्या रकमा ट्रान्सफर केल्या हा व्यवहार संशयास्पद आढळून आला आहे.
नगर अर्बन बँक ही काही वर्षांसाठी तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली होती. गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेले संचालक मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू केली आणि नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप सुरू केले. अर्थातच या कर्ज वाटपाचा काही हप्ता वरिष्ठ यांच्यापर्यंत देखील पोहोचत असल्याने त्यामुळे बराच काळ या प्रकरणाची कुठे वाच्यता होत नव्हती. ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत करण्यास अडचण येत असल्याने प्रकरण बाहेर आले आणि त्यानंतर हा घोटाळा तब्बल 291 कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले.
अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा सध्या मिळत नसल्याकारणाने अनेक ठेवीदारांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक जणांच्या कुटुंबातील लग्न रखडली आहेत तर काहीजणांना वैद्यकीय उपचारासाठी देखील पैसे राहिलेले नाहीत. केशव काळे याला अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.