नगर शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा नगरकरांच्या अडचणी वाढवत असून दुसरीकडे रात्रीच्या सुमारास केवळ उपनगरच नव्हे तर शहरातील पथदिवे देखील बंद असल्याचे गेल्या काही दिवसात सातत्याने दिसून येत आहे मात्र कथित कार्यसम्राटांचे फ्लेक्स दिसणे बंद झाले तर आपण नगर शहराबाहेर आलोत असे समजून घ्यावे इथपर्यंत सध्या जाहिरातबाजी सुरू आहे
नगर शहराला जोडणाऱ्या महामार्गावर देखील पथदिव्यांची हिच परिस्थिती असून दुसरीकडे एका लोकप्रतिनिधीचे शहरभर फ्लेक्स लावून जाहिरातबाजी सुरु आहे .खड्डेमय झालेले रस्ते त्यात उभे असलेले पोल आणि त्यावरील बंद पथदिवे हे शहरातील स्वरूप आहे. गेल्या पाच वर्षात शहरात एकही मोठा उद्योग आलेला नाही आणि एकाही तरुणाला रोजगार मिळालेला नाही अशी परिस्थिती असताना कथित कार्यसम्राटाची जाहिरातबाजी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलेली आहे.
बंद असलेल्या पथदिव्यांची ही परिस्थिती केवळ हायवेची नाही तर शहरातील प्रत्येक उपनगरात आणि उपनगरात देखील अशीच परिस्थिती आहे. पावसाळ्याच्या दिवसात भर रस्त्यात खड्डे खोदून ठेवले मात्र रस्त्याची कामे देखील योग्य त्या वेगाने होत नाहीत अशातच पथदिवे बंद असल्याकारणाने अपघाताचा देखील मोठा धोका निर्माण झालेला आहे.
एकेकाळी विवो कंपनीने मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली होती त्यावेळी विवोचे फ्लेक्स दिसणे बंद झाले तर आपण भारताबाहेर आलोत असे समजून घ्या इतपत मिम्स व्हायरल झालेले होते तशीच परिस्थिती सध्या कथित कार्यसम्राट यांची झालेली आहे आणि साहजिकच अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या या फ्लेक्सवर महापालिका प्रशासनाकडून अद्यापपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही किंवा होणारही नाही. गोरगरिबांची घरे तोडून त्यांचे संसार उध्वस्त करणारे महापालिका प्रशासन या अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई करेल का ? याचे उत्तर आता नगरकरांना हवे आहे.