महापालिकेचे सफाई कर्मचारी कितीही मन लावून काम करत असले तरी बेशिस्त झालेल्या नगरकरांवर कुठल्याही स्वरूपाची दंडात्मक कारवाई आत्तापर्यंत पालिका प्रशासनाने अद्याप केलेली नाही त्यामुळे अनेक नागरिक शहरात कचरा रस्त्यावर आणून टाकत असून त्यामुळे आरोग्य आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या काही दिवसात शहरात चिकनगुनिया , डेंगू , सर्दी खोकला असे अनेक आजार असताना शहरातील कचरा मोठ्या प्रमाणात साथी आटोक्यात येण्यास अडथळा ठरत आहे.
शहरात ठिकठिकाणी घंटागाडी फिरून कचरा गोळा करत असते मात्र अनेक नागरिक तरीदेखील कंटाळा करतात आणि परिसरातील रिकाम्या प्लॉटवर कचरा आणून फेकून निघून जातात. दुसरीकडे भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते देखील अशाच पद्धतीने वर्तन करतात आणि परिसरातील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो त्यामुळे मोकाट जनावरे आणि कुत्री यांचा देखील नागरिकांना उपद्रव वाढतो.
गेल्या दीड महिन्यांपासून शहरात डेंगू , चिकनगुनियाची साथ सुरू असून अनेक नागरिक अंगदुखीने हैराण झालेले आहेत. शाळांमध्ये देखील लहान मुलांची उपस्थिती काही प्रमाणात कमी झालेली असून घरातील महिलाच आजारी असल्याकारणाने कुटुंबातील व्यवस्थापन देखील बिघडलेले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने आळस झटकून कामाला लागण्याची गरज असून मोकळ्या जागांवर औषधाची फवारणी करणे, कचऱ्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे तसेच बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे अशा स्वरूपाच्या उपायांची गरज आहे. रात्री अपरात्री चोरांसारखा कचरा फेकून जाणाऱ्या नागरिकांवर कठोरात कठोर कारवाईची गरज असून धूर फवारणी शहरात नितांत गरजेची झालेली आहे.