काँग्रेसच्या भवितव्याबद्दल अरविंद केजरीवाल म्हणाले ‘ असे काही ‘ की ?

शेअर करा

बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार बिहारमध्ये स्थापन करण्यात आलं. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी माय-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.

शुक्रवारी केजरीवाल यांनी हिंदुस्तान टाईम्स लीडरशीप समिट २०२० मध्ये सहभाग घेतला होता. “काँग्रेसचे पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा कोणी माय-बाप आता शिल्लक नाही. राज्याराज्यात लोकं भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसचं भाजपाचं सरकार स्थापन करून देतं, काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मतं काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचंच बनतं,” असे देखील केजरीवाल पुढे म्हणाले.

‘ राष्ट्रीय स्तरावर कोणीतरी काँग्रेसचा पर्याय म्हणून असायला हवं. स्थानिक पक्ष वर येऊ द्या किंवा अन्य काही. परंतु आता काँग्रेसला कोणतंही भविष्य नाही . आम आदमी पक्ष हा एक छोटा पक्ष आहे. परंतु दिल्लीत आम्ही केलेल्या विकासकामांमुळे देशातील लोकं ‘आप’कडे आदरानं पाहतात. मला खात्री आहे की देशातील जनता भाजपला पर्याय नक्की देईल,” असंही केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.


शेअर करा