मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली असून त्यांच्या या उपोषणाला महाराष्ट्रभरातून मराठा बांधवांचा जोरदार पाठिंबा मिळताना दिसत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने 23 तारखेला अहमदनगर जिल्हा बंदची हाक दिलेली होती त्याला नगर शहरांसोबत जिल्हाभरातून संमिश्र स्वरूपाचा प्रतिसाद मिळालेला आहे.
केडगाव उपनगरात मराठा बांधवांना आरक्षण मिळावे यासाठी वेशीजवळ गोंधळाचे आयोजन करण्यात आलेले होते. सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी , हैदराबाद सातारा बॉम्बे गव्हर्मेंट गॅजेट लागू करावे , मराठा बांधवांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी सकल मराठा बांधवांच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली त्यावेळी व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माळीवाडा बस स्टॅन्ड येथील पुतळ्याला हा अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आलेली होती. मराठा बांधवांच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दर्शवत पाठिंबा दिला सोबतच मुस्लिम बांधवांनी देखील दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवलेली होती.