राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी ,’ एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून बोलणाऱ्यांना आवर घालण्याचे काम सत्ताधिकारी करत नाहीत याचा अर्थ सत्तेची मस्ती त्यांच्या डोक्यात गेलेली आहे अशावेळी सामान्य जनता त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही ,’ असे म्हटलेले आहे.
शरद पवार म्हणाले की ,’ सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला मात्र त्यांची पुढील पिढी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला लक्ष करते आहे ते पाहून एका मुख्यमंत्र्याची पुढची पिढी अशा पद्धतीने तयार झाल्याचे महाराष्ट्रात उदाहरण नाही. त्यांना कोणीही आवर घालत नाही याचा अर्थ त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे ,’
शरद पवार पुढे म्हणाले की ,’ मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर 80 वर्षांपूर्वी बांधलेले पुतळे वाऱ्याचा सामना करत आजही उभे आहेत मात्र मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे पडला असेल तर भ्रष्टाचार कोणत्या पातळीवर गेलेला आहे याचा अंदाज बांधता येईल. बारा बलुतेदार आणि अठरापगड जातीच्या लोकांचे हित जपले पाहिजे ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले काम व्हायला हवे ,’ असेही ते यावेळी म्हणाले.