आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केलेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा 27 तारखेला नगरमध्ये दाखल होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , खासदार अमोल कोल्हे , खासदार निलेश लंके आणि जेष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांची देखील यावेळी उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर हे प्रयत्नशील असून त्यांनी याप्रकरणी माहिती देताना,’ नागरिकांच्या समस्या जाणून घेणे. त्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी करणे या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आलेली आहे ‘ अशी माहिती दिली आहे.
अभिषेक कळमकर पुढे म्हणाले की ,’ या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवले जाणार असून युवाशक्तीला देशाच्या विकास प्रक्रियेत सहभागी करून घेणे ‘, हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. तरुणांच्या समस्या , शिक्षण , रोजगार याविषयी जागृती व्हावी यासाठी ही यात्रा महत्त्वाची ठरणार असून शहरातील राजकारणाच्या दृष्टीने देखील या यात्रेचे विशेष महत्त्व आहे.
अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात काही वर्षांपूर्वी दाखल झालेले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने शहरात जोरदार तयारी आणि संघटन बांधणीकडे विशेष लक्ष दिलेले असून येत्या आठ ते दहा दिवसात नगरच्या जागेसंदर्भात निर्णय होणार आहे त्यानंतर नगरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.