नगर जिल्ह्यात बेकायदा सावकारी प्रचंड बोकाळलेली असून चिचोंडी पाटील येथील एका व्यक्तीच्या घराची उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्या नियुक्त पथकाने झडती घेतली त्यावेळी काही कागदपत्रे आढळून आलेली आहेत .
महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 16 अन्वये उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्या नियुक्त पथकाने ही कारवाई केलेली असून पोपट गजानन कोकाटे असे या व्यक्तीचे नाव आहे. पाच सप्टेंबर 2024 रोजी त्याच्या घराची झडती घेण्यात आली त्यावेळी पथकाला काही कागदपत्रे आणि नोंदीचे रजिस्टर देखील आढळून आले आहे.
पोपट कोकाटे याच्यासोबत अवैध सावकारीतून काही व्यवहार झाले असल्यास संबंधित व्यक्तींनी पुराव्यासोबत ३० सप्टेंबर 2024 पर्यंत आपले म्हणणे तालुका उपनिबंधक कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका शुभांगी गोंड यांनी केलेले आहे.
नगर जिल्ह्यात बेकायदा सावकारीमुळे अनेक नागरिकांचे शोषण होत असून नागरिकांनी अशा सावकारांना न भिता तात्काळ तालुका उपनिबंधक कार्यालयाकडे आपले म्हणणे पुराव्यासोबत मांडावे अशा सावकारांवर कारवाई केली जाईल , असे देखील शुभांगी गोंड यांनी म्हटलेले आहे.