नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे 63 कोटी रुपये परत मिळतील अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिलेली आहे. रिझर्व बँकेने नगर अर्बन बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर ही आर्थिक संस्था अवसायनात काढण्यात आली आणि त्यानंतर आज हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ठेवीदारांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागत आहे.
नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जदारांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या थकीत कर्जाची रक्कम लवकरात लवकर भरावी आणि बँक प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केलेले असून सर्व ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत केले जातील असे आश्वासन दिले आहे. ज्या ठेवीदारांनी अद्याप केवायसी कागदपत्रे आणि क्लेम फॉर्म भरून दिलेले नाहीत त्यांनी तात्काळ नजीकच्या शाखेत ते जमा करावेत असे देखील अवसायक गणेश गायकवाड यांनी म्हटलेले आहे.
नगर अर्बन बँक बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र गांधी ठेविदारांच्या ठेवींची रक्कम परत मिळवून देणे आणि नगर अर्बन बँक पुन्हा वैभवशाली व्हावी यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करत असून या कामी अनेक ठेवीदारांना सोबत घेऊन लढा देत आहेत.