दिवाळीत फटाका स्टॉल लावण्यासाठी पारनेर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने तीन हजार रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला असून पारनेर पोलीस ठाण्यातील या कर्मचाऱ्याची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी लोकजागृती जागतिक सामाजिक संस्थेने केलेली आहे.
दिवाळीत फटाका स्टॉल लावण्यासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे असते. निघोज येथील एका व्यावसायिकाने ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला म्हणून त्यासाठी तो पोलीस ठाण्यात गेलेला होता. संबंधित पोलीस हवालदार यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली आणि त्यानंतर 3000 रुपये संबंधित व्यावसायिकाकडून घेतले. विशेष म्हणजे त्यावेळी हा पोलीस कर्मचारी आम्ही सगळ्यांकडून असे पैसे घेतो असे देखील बोलताना दिसून येतो.
पारनेर पोलिसांच्या लाचखोरीचा हा अद्भुत प्रकार समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तींवर काय कारवाई केली जाईल असा खडा सवाल पारनेरकरांनी उपस्थित केलेला असून पारनेर पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी ‘ व्हिडिओची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल सादर करू. कुणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही ,’ असे म्हटलेले आहे.
पारनेर तालुक्यात अवैध व्यवसाय जोरदारपणे सुरू असून व्यावसायिकांना पोलिसांचा पाठिंबा असल्याशिवाय हे व्यवसाय सुरूच राहू शकत नाहीत मात्र या व्यवसायिकांकडून पोलिस मोठ्या प्रमाणात वसुली करतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत नाहीत अशी पारनेरमध्ये चर्चा आहे.