विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्यावतीने नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा काढण्यात आलेली होती. शहर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘ तुमच्या मनातील उमेदवार विधानसभेला देऊ ‘ असे म्हटले त्यामुळे अभिषेक कळमकर हे आगामी विधानसभा निवडणूक लढवतील असे संकेत मिळत आहेत.
अभिषेक कळमकर गेल्या काही वर्षांपासून निर्भीडपणे नगरकरांचे प्रश्न मांडत आहेत. शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे , खासदार निलेश लंके , माजी आमदार दादाभाऊ कळमकर , अंकुश काकडे, शौकत तांबोळी , निलेश मालपाणी यांच्यासोबत विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते
शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी यावेळी बोलताना ,’ शिवस्वराज्य यात्रा ही आजच्या काळाची गरज असून पुरोगामी विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्या विचारांना नगरकरांनी कायमच साथ दिलेली आहे मात्र दुर्दैवाने गेली दहा वर्ष ज्यांना पक्षाने संधी दिली त्यांनी सत्तेसाठी विचार सोडून दिलेले आहेत. नगर शहर भकास करण्याचे काम त्यांच्या काळात झालेले असून शहरात गुंडगिरी आणि दहशत वाढलेली आहे. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ,’ असे म्हटलेले आहे
अभिषेक कळमकर पुढे म्हणाले की ,’ शहरात मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे खरे तर ज्या प्रॉडक्टची किंमत कमी होते त्यालाच पोस्टरबाजी करावी लागते. आम्ही लोकांच्या मनात घर केलेले आहे त्यामुळे आम्हाला ब्रँडिंगची गरज नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे. माझ्या डोक्यावर शरद पवार यांचा हात आहे , जयंत पाटील यांचे पाठबळ आहे , निलेश लंके यांनी हे देखील सोबत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू,’ असे देखील त्यांनी यावेळी म्हटलेले आहे.