मनपा आयुक्त यशवंत डांगे स्वच्छता अभियानात स्वतः सहभागी होत असले तरी हे स्वच्छता अभियान हे फक्त खराटा आणि कर्मचारी घेऊन फोटोसेशन करण्यापर्यंत आहे. प्रत्यक्षात काम शून्य आहे. कचरा व्यवस्थापनामध्ये महाघोटाळा झालेला आहे त्यात अधिकाऱ्यांचे हात ओले झालेले आहेत, असा घणाघाती आरोप माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी केलेला आहे.
संजय झिंजे यांनी म्हटले आहे की , घंटागाडीचे व्यवस्थापन हे अत्यंत ढिसाळ आहे. एका राजकीय पुढार्याचा हात डोक्यावर असल्यामुळे ठेकेदार महापालिकेतील अधिकाऱ्यांना घाबरत नाहीत. आयुक्त हे संपूर्णतः निष्क्रिय असून केवळ चमकोगिरी करत स्वच्छता अभियानाचे फोटोसेशन करत आहेत. महापालिकेने तक्रारीसाठी जाहीर केलेला नंबर कोणीही उचलत नाही मग तो जाहीर तरी कशासाठी केला ? ‘
संजय झिंजे पुढे म्हणाले की ,’ सध्या शहरात चिकनगुनिया , डेंगू , गोचीडतापाची साथ सुरू आहे. दिल्लीगेट , चितळेरोड , नेता सुभाष चौक या रोडवर अनेक अनेक नगरकर राहतात मात्र याच रोडवर फळ विक्रेते आणि भाजीवाले देखील असतात. संध्याकाळी घंटागाडी आली नाही तर परिसरातील विक्रेते दुकानासमोर कचरा टाकून निघून जातात. पावसाळ्याच्या पाण्यामुळे कचरा ओला झाल्यानंतर सर्वत्र दुर्गंधी पसरते आणि त्यातून डास देखील वाढतात .
अनेकदा तक्रारी करून देखील घंटागाडी नियमित येत नाही. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असून नगरकरांच्या आरोग्याच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झालेला आहे घंटागाडी संबंधित व्यक्तींना आयुक्तांनी कडक सूचना कराव्यात. कचराकुंडी मुक्त नगर करण्याचे ठरले होते त्यासाठी घंटागाड्या घेतल्या होत्या मात्र अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचक राहिलेला नाही त्यामुळे नगर शहर कचराकुंडी मुक्त झालेले नाही. महापालिकेच्या नंबरवर फोन केल्यावर कोणीही फोन उचलत नाही ,’ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.