नगर जिल्ह्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात शेअर मार्केट चा मोठा घोटाळा समोर आल्यानंतर देखील आरोपी एजंट व्यक्तींना दिलेले पैसे परत मिळालेले नाहीत म्हणून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी आणि मालमत्ता जप्त करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्मायलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी राज्यपालांकडे एक पत्र लिहून केलेली आहे. कारवाई झाली नाही तर राज्यपालांच्या गेटला रक्ताचा अभिषेक घालू आणि तिथेच उपोषणाला बसू असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे.
स्मायलींग अस्मिता कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी याप्रकरणी एक प्रसिद्धी पत्रक दिलेले असून त्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ,’ गेल्या काही वर्षांपासून शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार झालेले आहेत. अनेक जणांनी आपले लांबपर्यंत संबंध आहेत. तुमची शासकीय कार्यालयातील कामे मार्गी लावून देतो. ठेके मिळवून देतो असे सांगत किंवा व्यवसाय वाढीसाठी म्हणून उसने पैसे घेऊन अनेक जण फरार झालेले आहेत.’
शेअर मार्केट मध्ये अनेक जणांनी एजंट लोकांच्या शब्दाला भुलून पैसे अडकवले तर काहींनी शेतीसाठी कर्ज मिळून देण्याच्या आमिषाने ग्रामीण भागातील तरुणांना लुबाडले. कर्ज काढून सदर व्यक्तींनी ही रक्कम एजंट व्यक्तींना दिलेली होती मात्र ही रक्कम परत मिळाली नाही. कर्जाची रक्कम काढून दुसऱ्याच व्यक्तींनी वापरली आणि ते व्यक्ती फरार झाले. तक्रारदार व्यक्तींना खोट्या केसमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ कारवाई करावी ,’ असा इशारा यशवंत तोडमल यांनी दिलेला आहे .