अहमदनगर येथील सह्याद्री छावा सामाजिक संघटनेच्या वतीने काल 30 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे.
नगर चौफेर प्रतिनिधीने उपोषणकर्त्या व्यक्तींची चर्चा केल्यानंतर त्यांनी आपले म्हणणे मांडताना ,’ अहमदनगर जिल्हा परिषदचा पदभार घेतल्यानंतर आशिष येरेकर यांची ठेकेदारांवर मर्जी असून त्यांच्या कार्यकाळातील कामे ही ठेकेदारांशी संगनमत करून करण्यात आलेली आहेत. टेंडरनुसार अटी शर्तीचे पालन न करताच जलसंधारण विभागातील कामे नियमबाह्य आणि चुकीची झालेली आहेत मात्र तक्रारींची कुठलीच दखल न घेता ठेकेदारांना बिले अदा करण्यात आली आणि तक्रारीवर देखील कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही , ‘ असे म्हटलेले आहे .
उपोषणकर्ते रावसाहेब शंकर काळे यांनी या प्रकरणी म्हणणे मांडताना म्हटले की ,’ जिल्हा परिषद विभागाचे कलरचे काम निकृष्ट मटेरियल वापरून झालेले आहे. सदर रंगकामाची चौकशी करण्यात यावी. आपल्या मर्जीनुसार उल्लंघन करून कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन ही कामे झालेली असून बेकायदेशीर कृत्याबाबत अनेकदा तक्रार करून देखील कुठलीही कारवाई न करता केवळ उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलेली आहेत.’
नेवासा तालुक्यातील एका कार्यकर्त्याने अनेक शिक्षक मुख्यालयात न राहता भत्ता घेतात याविषयी देखील तक्रार केली मात्र त्यांच्या या तक्रारीवर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांना त्याच ठिकाणी कार्यरत ठेवण्यास कोणाचा आशीर्वाद आहे याची देखील चौकशी करावी , अशी देखील आंदोलकांनी मागणी केलेली आहे. सदर अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी अन्यथा त्यांची तात्काळ इतरत्र बदली करावी यासाठी 30 सप्टेंबर पासून या उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली असून आज दुसऱ्या दिवशी देखील हे उपोषण सुरू आहे. सरकार दरबारी आपल्या उपोषणाची कुठलीच दखल घेतलेली नाही अशी देखील खंत आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे.