नगर अर्बन बँक बचाव कृती समिती गेल्या अनेक महिन्यांपासून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी संघर्ष करत असून न्यायालयीन तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे ठेवीदारांची मात्र सातत्याने ससेहोलपट होत आहे. नगर अर्बन बँक बंद पडून एक वर्ष होऊन गेले तरी पोलिसांकडून गंभीर आणि ठेवीदारांना दिलासा मिळावी अशी कृती होत नाही. 105 आरोपी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून आले मात्र अटक झालेल्या आरोपींची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. आपली पुढील रक्कम कधी मिळणार अशी चिंता ठेवीदारांना असून पोलीस तपासावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे .
नगर अर्बन बँक बचाव कृती समिती च्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी बँक बचाव कृती समितीचे सक्रिय सदस्य डी एम कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत धक्कादायक असे आरोप केलेले आहेत. डीएम कुलकर्णी यांनी यावेळी ,’ नगर शहरात राजरोस लपून काही आरोपी राहतात शहरात उघडपणे फिरतात. आरोग्याच्या तक्रारी घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वतःला ऍडमिटही करून घेतात. ठेवीदारांना आणि नागरिकांनाही आरोपी दिसतात फक्त पोलीस दलाला संपर्क केले की आरोपी फरार होतात त्यामुळे आरोपींनाच पोलिसांचे छुपे संरक्षण दिसते आहे ,’ असा आरोप केलेला आहे.
नगर अर्बन बँक बचाव कृती समिती सर्व प्रक्रिया जलद गतीने व्हाव्यात यासाठी पोलीस दलाशी संपर्कात असून बँकेची कर्जे वसूल व्हावी आणि ठेवीदारांना ठेवीची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे. थकबाकीदार असलेल्या कर्जदारांची नावे आता वर्तमानपत्रात जाहीर करण्यात येतील असा इशारा समितीने दिलेला आहे. लवकरात लवकर कर्जाची परतफेड करावी यासाठी कर्जफेड योजना देखील चालू करण्यात आली त्याचाही काही जणांनी फायदा घेतला मात्र अद्यापही मुख्य आरोपी हे पैसे भरण्यास धजावत नाहीत अशी देखील खंत ठेविदारांनी व्यक्त केलेली आहे.
नगर अर्बन बँक ही काही वर्षांसाठी तत्कालीन अध्यक्ष माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली होती. गांधी यांच्या नेतृत्वाखाली असलेले संचालक मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात मनमानी सुरू केली आणि नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप सुरू केले. अर्थातच या कर्ज वाटपाचा काही हप्ता वरिष्ठ यांच्यापर्यंत देखील पोहोचत असल्याने त्यामुळे बराच काळ या प्रकरणाची कुठे वाच्यता होत नव्हती. ठेवीदारांच्या ठेवी पुन्हा परत करण्यास अडचण येत असल्याने प्रकरण बाहेर आले आणि त्यानंतर हा घोटाळा तब्बल 291 कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले.
अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या रकमा सध्या मिळत नसल्याकारणाने अनेक ठेवीदारांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी निर्माण झालेले आहेत. अनेक जणांच्या कुटुंबातील लग्न रखडली आहेत तर काहीजणांना वैद्यकीय उपचारासाठी देखील पैसे राहिलेले नाहीत. दिलीप गांधी यांच्या नेतृत्वात बँक गेल्यानंतर इतर संचालकांनी गांधी यांच्यासोबत मिळून मोठ्या प्रमाणात अपहार केला त्यामुळे ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळाली नाही आणि त्यानंतर आज रोजी बँकेवर अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे.