गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात जणू काही कोणी अवतारी पुरुष अवतरला आहे आणि नगरकरांचा विकास फक्त आम्हीच करू शकतो अशा स्वरूपात जाहिरातबाजी सुरू आहे. शहरात सुरू असलेली विकास कामे ही सरकारी निधीतून करण्यात येत असली तरी कामे करणाऱ्या जेसीबी आणि ट्रॅक्टरवर मात्र एका लोकप्रतिनिधीच्या वतीने स्वतःच्या सोशल फाउंडेशनचे नाव झळकवण्यात येत आहे.
नगर शहर आणि उपनगरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली असताना खड्डे बुजवण्यापेक्षा माती सरकवणे , सपाटीकरण व काही प्रमाणात उपनगरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. महापालिकेचे काही कॉन्ट्रॅक्टर या कामांसाठी जुंपण्यात आलेले असून विशेष बाब म्हणजे महापालिकेच्या पैशातून करण्यात येणाऱ्या या कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर एका सोशल फाउंडेशनच्या जाहिरातीचे बॅनर लावून ही कामे सुरु आहेत.
एखादी सामाजिक संघटना असेल आणि स्वतःच्या पैशाने ती खर्च करत असेल तर एक वेळ गोष्ट समजण्यासारखी आहे मात्र याप्रकरणी कामाला लावण्यात आलेले जेसीबी ट्रॅक्टर ट्रॉलीज या पालिकेच्या ठेकेदारांच्या आहेत आणि या कामांचे पेमेंट महापालिका प्रशासन करते. सदर ठेकेदारांनी या सोशल फाउंडेशनचे नाव आपल्या वाहनांवर कुणाच्या सांगण्यावरून कि आदेशावरून लावलेले आहे आणि पालिका अधिकारी देखील अशा प्रकारांकडे कशामुळे डोळे झाक करत आहेत देखील एक रहस्य बनून राहिलेले आहे.