गाईंना राज्य मातेचा दर्जा देण्याचा अजब निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर एकीकडे गोरक्षकांमध्ये आनंदउत्सव साजरा केला जात असला तरी अनेक शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या नद्यांची मात्र राज्यात दयनीय परिस्थिती आहे.
कंपन्यांच्या औद्योगिक प्रदूषणामुळे सध्या राज्यातील नद्यांची परिस्थिती पाणी कमी आणि केमिकल जास्त अशा स्वरूपाची झालेली असून अनेक ठिकाणी औद्योगिक प्रदूषणामुळे शेती देखील करणे अवघड झालेले आहे.महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ कार्यरत असले तरी तितकेसे सक्रिय दिसून येत नाही त्याचाच परिणाम म्हणून प्रदूषित पाण्याने शेती तसेच नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत आहे.
एकीकडे बहिणी लाडक्या झाल्या गाय राज्यमाता झाली मात्र कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेल्या नद्यांची मात्र परिस्थिती दयनीय झालेली आहे. नगर शहरातील सीना नदीची परिस्थिती पाहिली तर नक्की आपण नदी पाहतोय की गटार पाहतोय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतरच या नदीत प्रत्यक्ष पाणी दिसते इतर वेळी मात्र सीना नदी ही नदी आहे हे बाहेरून आलेल्या व्यक्तींना पटवून द्यावे लागते.