राज्यात घमासान ..प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात : पहा कोण काय म्हणाले ?

  • by

मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचा मुलगा विहंग याला ईडीने ताब्यात घेतले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घऱी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयचे (ईडी) पथक दाखल झाले आणि कारवाईला सुरुवात केली. प्रताप सरनाईक हे परदेशात असताना ही कारवाई करण्यात आली हे विशेष आणि यासाठी आपल्याला कोणतीही नोटीस दिली गेली नसल्याचे देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरातील एकूण १० ठिकाणी ईडीकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी देखील ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे.

सध्या प्रताप सरनाईक परदेशात असून त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध केला आहे. प्रताप सरनाईक मराठी वृत्तावाहिनीशी संवाद साधताना म्हणाले की, ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. मला ईडीकडून कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती. पण तरीही छापा टाकण्यात आला आहे, असा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

विहंग सरनाईक यांना घेऊन ईडीचं पथक निघून गेलं आहे. त्यांना चौकशीसाठी मुंबईला घेऊन येण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांजवळ सर्च ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जात आहे. तसेच काही राजकारण्यांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणौत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आरोप – प्रत्यारोप केले होते. प्रताप सरनाईक यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची महाविकास आघाडीत चर्चा आहे.

प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ‘मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,’ याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अर्णब गोस्वामी, कंगना राणौत प्रकरणात सरनाईक यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाची बाजू लावून धरली होती. त्यामुळेच त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याची चर्चा शिवसेनेत आहे.

प्रताप सरनाईकांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कितीही दबाव आणला तरी महाविकास आघाडीचे सरकार, मंत्री आणि आमदार शरण जाणार नाहीत. सरकारी संस्थांच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सुरुवात तुम्ही केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. मात्र अशा कारवाया करून पुढची २५ वर्षे भाजपाचे महाराष्ट्रात सरकार येणार नाही. तसेच सरकारी संस्थांनी राजकीय शाखा असल्यासारखे वागू नये, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. सचिन सावंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, गेल्या ६ वर्षांत एकातरी भाजपा नेत्यावर ईडी, सीबीआय किंवा आयटीची कारवाई झाली का? विरोधी पक्षाची सरकार असतात तिथेच कारवाई का होते? कमलनाथांच्या लोकांवर, गेहलोत सरकार पाडण्यासाठी व कर्नाटक मध्ये तेच झाले! शरद पवार, सुप्रिया ताई व पृथ्वीराज चव्हाण यांना देखील आयटीची नोटीस दिली गेली आहे.

भाजपाचा एकही उमेदवार यांना सापडू नये? ज्यांना विरोधी पक्षात असताना चोर म्हणतात ते भाजपात गेल्यावर पवित्र कसे होतात? भाजपाने लोकशाही संकटात आणली आहे हे जनतेने ओळखावं. प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाई ही मविआ सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या षडयंत्राचा भाग आहे. पण आम्ही एक आहोत, असेही सावंत यांनी सांगितले आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चूक असेल तर एजन्सी कारवाई करेल, चूक नसेल तर घाबरण्याचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवर दिली आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी राज्य सरकारनं ईडीची वाट न पाहता त्यांच्याकडे असलेली सीडी काढावी, असं आव्हान दिलं आहे

नारायण राणे यांनी यावर प्रतिक्रिया देताना, ‘ प्रताप सरनाईक यांच्यावर कायदेशीर कारवाई आहे आणि कायदेशीर बाबींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. मीडियाने आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ ‘ असे म्हटले आहे.