राजकारण पेटलेलेच ..ईडीवाले खोदकाम करत मोहंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले

शेअर करा

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर काल (मंगळवारी) सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यांचे पुत्र विहंग यांना ताब्यात घेऊन त्यांची पाच तास चौकशी करण्यात आली. यानंतर आज प्रताप सरनाईक आणि विहंग यांची चौकशी करण्यात येणार होती यावरून शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. सध्या सूडाचं राजकारण सुरू आहे. पण राज्यात त्यांची सत्ता नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.

आम्ही चौकशांना घाबरत नाही. चौकशांना आता तुम्ही घाबरायला हवं. कारण राज्यात तुमचं सरकार नाही आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. सध्या जुनी थडगी उकरण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. सध्या ते उत्खनन करत आहेत. आता ईडीवाले खोदकाम करत मोहंजोदडो, हडप्पापर्यंत पोहोचले आहेत, असा टोला राऊत यांनी लगावला. तुम्हाला ईडीची नोटीस आली का?, या प्रश्नाला राऊत यांनी अद्याप तरी आलेली नाही. मी वाट पाहतो आहे. सध्याच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणं आणि भाजपविरोधात बोलणं हा गुन्हा आहे, असं उत्तर दिलं.

तुम्हाला ईडीची नोटीस आली का असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. पण अद्याप तरी तशी कोणतीही नोटीस आलेली नाही. पण मला, अजित पवारांना तशी नोटीस येऊ शकते. गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ईडीनं नोटीस पाठवली होती, असं राऊत म्हणाले. आपला गैरव्यवहारांशी कोणताही संबंध नसल्याचं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे. मराठी माणसानं व्यापार करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आर्थिक गैरव्यवहार केलेल्या १०० नेत्यांची यादी माझ्याकडे आहे, असा दावा राऊत यांनी केला होता. त्याबद्दल विचारलं असता, सध्या सुरू असलेलं सुडाचं अन् बिनबुडाचं राजकारण संपू द्या. आज पत्ते तुम्ही पत्ते पिसताय, पण डाव आम्ही उलटवू, असा इशारा राऊत यांनी भाजपला दिला. सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी संपू द्या. मग १२० प्रमुख नेत्यांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाला पाठवेन. त्यांच्यावर काय कारवाई होते बघू, असं राऊत यांनी सांगितलं.

प्रताप सरनाईक घरी नसताना त्यांच्या घरावर छापे टाकणं यात मर्दानगी कसली?, असा सवाल काल राऊत यांनी विचारला होता. त्यावर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांनी ‘कंगना कार्यालयात नसताना तिचं कार्यालय पाडण्यात मर्दानगी होती का?’, असा प्रतिप्रश्न केला होता. त्यावर भाष्य करताना कंगनानं मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं, त्याचं समर्थन भाजप नेते करतात का?, असा सवाल राऊत यांनी विचारला. मुंबईला पीओके म्हणणारे घरी असोत वा नसोत, त्यांच्यावर कारवाई होणारच, असं राऊत म्हणाले.


शेअर करा