हॅट्स ऑफ नगर पोलीस..राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचे मारेकरी गजाआड : वाचा पूर्ण बातमी

  • by

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपींना पारनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी न्यायालयाने त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसेच सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस तपासात आरोपींकडून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे

उपलब्ध माहितीनुसार, फिरोज शेख, गुड्डू शिंदे व आदित्य चोळके अशी आरोपींची नावे आहेत. रेखा जरे प्रकरणात पोलिसांनी काल मंगळवारी विविध ठिकाणांहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना आज बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. मनिषा डुबे यांनी आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे..

नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. मारेकऱ्यांच्या शोधासाठी सोमवारी रात्रीपासून सहा पोलीस पथके रवाना करण्यात आली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोवरून पोलिसांनी मारेकऱ्यांचा श्रीरामपूर व राहाता परिसरात शोध घेतला. अखेर राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात मंगळवारी रात्री दोघांना तर कोल्हापूर येथून एकाला अटक केली. कारला कट मारल्याचा कारणावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र जरे यांची हत्या ही सुपारी देऊनच केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. अर्थात ही सुपारी कोणी आणि काय कारणावरून दिली याचा तपास होणे अद्याप बाकी आहे.

काय आहे प्रकरण ?

रेखा जरे या पुण्यावरून अहमदनगरला येत असताना जातेगावच्या घाटात असतानाच त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या रेखा यांना काही वेळातच नगर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. घटनेत घातपाताचा देखील संशय सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता तसेच घडलेले कारण हे तात्कालिक नसावे तर हा पुर्ननियोजीत कट असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत होती.

गाडीला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून रेखा जरे यांची आरोपीसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतरच जरे यांच्यावर हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. जरे यांच्यासोबत त्याच्या आई आणि लहान मुलगा होता. गाडीचा मिरर लागल्याच्या शुल्लक कारणावरून हुज्जत घालण्यास सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे .

जरे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती .मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान या घटनेमुळे नगर जिल्हा हादरून गेला असून अवघ्या काही तासांत आरोपीस गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मयत रेखा जरे यांच्या आई सिंधुबाई सुखदेव वायकर (वय 60, रा. माळी बाबळगाव, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी याबाबत मंगळवारी (दि.1) पहाटे सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 302, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . दरम्यान पोलिसांकडून आरोपीचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते आणि सोशल मीडियावर हे व्हायरल झाल्यावर पोलिसांना एक क्लू मिळाला आणि आरोपीस काही तासात अटक करण्यात आल्याने नगर जिल्हा पोलिसांचे सगळीकडे कौतुक होत आहे .