दाऊद इब्राहिम याच्यासह त्याच्या पत्नीला देखील कोरोना..पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात झालाय भरती

शेअर करा

दाऊद इब्राहिम आमच्याकडे नाहीच असे म्हणणाऱ्या पाकिस्तानचा पर्दाफाश झाला असून दाऊद इब्राहिम यास कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिलं आहे . दाऊदबरोबरच त्याच्या पत्नीलाही करोनाचा संसर्ग झाला असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे .दाऊद आणि त्याच्या पत्नीची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याने पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे . आंतरराष्ट्रीय स्तरावर ह्या बातमीचा मोठा परिणाम होणार असून पाकिस्तानची मोठी नाचक्की होणार आहे .

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मात्र आता दाऊदला करोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे. दहा दिवसांपूर्वीच दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना भेटल्याचेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहेत. दाऊदच्या संपर्कातील लोकांची देखील तपासणी करण्यात येणार आहे .

भारताने मागील अनेक वर्षांपासून दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटलं होतं. तसेच यासंदर्भात पाकिस्तानने चौकशी करुन दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याच्या मागण्याही अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळेस पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानमध्ये नाही असं सांगत त्याची पाठराखण केली होती. मात्र आता करोनामुळे पाकिस्तानचं पितळं उघडं पडलं आहे. दाऊद हा कराचीमधील एका उच्चभ्रू वस्तीत राहत असून येथे पाकिस्तानी सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी आणि आयएसआयचे अधिकारी राहतात. त्यामुळेच आता दाऊदला करोनाची लागण झाल्याच माहिती समोर आल्याने पाकिस्तान यासंदर्भात काय खुलासा करेल यावर सर्व आंतरराष्ट्रीय माध्यमांची नजर असणार आहे .


शेअर करा