करार संपल्यानंतर शिक्षिका फ्लॅट सोडेना म्हणून मालकाने केले ‘ असे ‘ की..

शेअर करा

करार संपल्यानंतर फ्लॅट सोडण्यास सातत्याने नकार देणाऱ्या भाडेकरी असलेल्या महिलेस घरमालकाच्या कुटुंबीयाने ऑनलाइन खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षिकेला जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोंडल्याचा धक्कादायक प्रकार पुणे शहरातील विमाननगर परिसरात उघडकीस आला असून घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

विमाननगरमधील गुलमोहर रॉयल सोसायटीत ही घटना घडली. याबाबत स्लायशा दीक्षित (वय ३३) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार घरमालक मरजाबान वेलाटी (रा. ठाणे, मुंबई), नाहिद वेलाटी, ज्वेल मॉरिस पॉल (रा. विमाननगर) यांच्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लायशा दीक्षित ह्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन खासगी क्लास घेतात. त्यांनी वेलाटी यांचा फ्लॅट करार करून राहण्यासाठी घेतला होता. त्यानंतर त्या नियमितपणे घरभाडे देत होत्या. काही दिवसांपूर्वी घराचा करार संपल्यामुळे वेलाटी कुटुंबीयांनी स्लायशा यांना फ्लॅट सोडण्यासाठी तगादा लावला होता. मात्र, त्यांनी फ्लॅट न सोडल्यामुळे दोन दिवसांपूर्वी वेलाटी कुटुंबीय स्लायशा राहत असलेल्या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी स्लायशाला ‘तू फ्लॅट का खाली करीत नाहीस,’ अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन स्लायशा राहत असलेल्या फ्लॅटला बाहेरून कुलूप लावून कोंडून घेतले. त्यामुळे संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


शेअर करा