मुलांनी कायद्याचं शिक्षण घेऊन ११ वर्षांनी वडिलांची निर्दोष मुक्तता केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. वडील जेलमध्ये गेले तेव्हा मुलं लहान होती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने योग्य वकील न मिळाल्याने तब्बल अकरा वर्षांपासून वडील तुरुंगात अडकून पडलेले होते. कानपूरच्या बिथूर पोलीस स्टेशन परिसरातील हे प्रकरण आहे.
आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता व्हावी आणि त्यांना जेलमधून लवकर बाहेर काढता यावं यासाठी दोन्ही मुलांनी कायद्याचा अभ्यास सुरू केला, शिक्षणं घेतलं आणि पदवी घेतल्यानंतर वडिलांची केस लढवली आणि खोट्या सामूहिक बलात्कार प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता केली. अनिल गौर असे निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अनिल गौर यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने शेतीवरून झालेल्या वादामुळे त्यांच्यावर सामूहिक बलात्काराचा खोटा गुन्हा २०१३ ला दाखल केला त्यामुळे अनिल यांना खोट्या खटल्यात जेलमध्ये जावं लागलं. पती जेलमध्ये गेल्यावर पत्नीने पतीसाठी घरोघरी मदत मागितली पण काहीच फायदा झाला नाही. दोन्ही मुलांनी आपल्या आईची योग्य वकिलासाठी होत असलेली ससेहोलपट पाहिली आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरू केले.
तब्बल अकरा वर्ष पैसे नसल्यामुळे योग्य वकील देखील अनिल गौर यांची केस घेण्यास तयार होत नव्हते. दरम्यानच्या काळात मुलं मोठी झाली आणि त्यांनी केस लढवून वडिलांची निर्दोष मुक्तता केली. अनिल यांची मुलगी उपासना आणि मुलगा ऋषभ अशी या मुलांची नावे असून आपल्या वडिलांसाठी आयुष्यातील पहिली केस लढली आणि ११ वर्षांनंतर कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
सामूहिक बलात्काराच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतर आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल गौर म्हणाले की, त्यांची मुलं त्यांच्यासाठी देवदूतापेक्षा कमी नाहीत. देव प्रत्येकाला त्यांच्यासारखीच मुलं देवो. तर मुलांनी सांगितलं की, गेल्या ११ वर्षांत अनेक समस्या जवळून पाहिल्या आहेत. घरात पैसे नव्हते आणि पैशांअभावी वकील कोणतंही काम करत नव्हते. म्हणून निश्चय केला की, आता आपणच आपल्या वडिलांची निर्दोष मुक्तता करून त्यांना जेलमधून बाहेर काढू.