सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर राज्यात अराजक माजले असल्याची टीका विरोधकांकडून सुरू झाली असून तीन आठवडे उलटून देखील संशयित आरोपी पोलिसांना मिळून येत नसल्याने पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आरोपींना अटक आणि सूत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यात जोर पकडत असून आज 28 तारखेला बीडमध्ये सर्व जातीय आणि सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आलेला होता.
दिवंगत संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत भाजपचे आमदार सुरेश धस शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते.
संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. एका पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, ॲट्रॉसिटी आणि पवनचक्कीवर गोंधळ असे सुमारे चार गुन्हे याआधीच केज पोलीस ठाण्यात दाखल आहेत. सीआयडी या प्रकरणाचा तपास करत असून संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा समावेश असून खंडणी प्रकरणात चाटे याच्यासोबत वाल्मीक कराड हा देखील संशय आरोपी आहे.