दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले – किरण काळे 

शेअर करा

अहिल्यानगर : दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. भारताच्या आजवर झालेल्या पंतप्रधानांच्या मांदियाळीत सर्वात उच्चशिक्षित असणारे सिंह हे जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञ होते पण याचा त्यांना कधीही गर्व नव्हता. ते राजकारण चांगल्या पद्धतीने समजत होते. परंतु ते राजकारणी नव्हते असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण ते परंपरागत मंत्री, पंतप्रधान असे नव्हते. मितभाषी असणाऱ्या सिंह यांच्याकडे प्रचंड अशी नम्रता होती. डॉ. सिंह यांनी आर्थिक उदारीकरणाचे धोरण राबवून देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले, असे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. 

मनमोहन सिंह यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजलीसाठी अहिल्यानगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष कार्यालयात  काळे यांच्या अध्यक्षतेखाली शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काळे बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माथाडी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे प्रदेश पदाधिकारी सुनील क्षेत्रे, साफसफाई कामगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष डॉ. जाहिदा शेख, दिव्यांग शहर काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष मिनाज सय्यद, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर काँग्रेस सामाजिक न्याय युवा आघाडीचे अध्यक्ष गौरव घोरपडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 

किरण काळे यावेळी म्हणाले की, देशासमोर कितीही मोठे संकट आले तरी त्याला धीराने सामोरे जाणे हे सिंह यांचे वैशिष्ट्य होते. १९९१ च्या आर्थिक संकटातून त्यांनी देशाला अत्यंत कुशलतेने बाहेर काढले. भारताला जागतिकीकरणाशी खुल्या अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून जोडले. २००८ च्या जागतिक मंदीच्या काळामध्ये त्यांच्या आर्थिक धोरणामुळे देशाला झळ बसली नाही. मनरेगा, आरटीआय, खाद्यान्न सुरक्षा, भूमी अधिग्रहण, शिक्षणाचा हक्क, वनधिकार असे अनेक लोकांभिमुख कायदे डॉ. सिंह यांच्या कालखंडात झाले. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधान कार्यकाळ मधील तो दहा वर्षाचा कालखंड हा आधुनिक भारताचा सुवर्ण काळच म्हणावा लागेल, असे यावेळी काळे म्हणाले. 

अहिल्यानगरच्या शीख पंजाबी समाजाच्या बांधवांशी त्यांचा संपर्क होता. अनेक लोक त्यांना विविध प्रश्न घेऊन शहरातून संपर्क करत असत. त्याबाबत जातीने लक्ष घालून मदत करण्याची त्यांची भूमिका असायची. सिंह यांच्या बाबतच्या अनेक आठवणी शहरातील समाज बांधव सांगताना त्यांचे डोळे पाणवतात. शहरातील शीख पंजाबी बांधवांच्या पाठीशी काँग्रेस कायम उभी राहील, असे यावेळी किरण काळे म्हणाले. 


शेअर करा