लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार कोपरगावमध्ये समोर आलेला असून फ्लॅटच्या खरेदी खताची नोंद लावण्यासाठी खाजगी व्यक्तीमार्फत लाच घेतल्याच्या आरोपावरून तलाठ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोपरगाव शहरातील ही घटना आहे.
कोपरगाव येथील घरमालकाने 28 सप्टेंबर 2022 रोजी सदनिका खरेदी केली होती आणि कोपरगावचे तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे ( साईसिटी नगर कोपरगाव ) यांच्याकडे इंडेक्स दोनची प्रत जमा करण्यात आलेली होती त्यानंतर एक खाजगी व्यक्ती करण नारायण जगताप ( साई सिटी नगर कोपरगाव ) याने फिर्यादी यांच्याशी संपर्क केला आणि साडेसहा हजार रुपयांची मागणी केली.
घरमालक यांनी त्यानंतर अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दोन तारखेला तक्रार दिली आणि पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर करण जगताप याला साडेसहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने आपण ही लाच तलाठी यांच्या सांगण्यावरून घेत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर तलाठ्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला.