‘ नगर शहरातील विकास कामांमधून शहर नावारूपाला आणायचे आहे. रस्ते बदलले म्हणजे शहर बदलले असे नाही. आपण स्वतःला स्वयंशिस्त लावून आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर करावा. आपल्या घरातील कचरा घंटागाडीतच टाकला पाहिजे. काही लोक प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरून रस्त्यावर फेकून देतात ही बाब चांगली नाही. शहर विकासामध्ये नागरिकांची जबाबदारी तितकीच मोठी आहे ,’ असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलेले आहे.
गावडे मळा , गोकुळधाम इथे माजी नगरसेविका दिपाली बारस्कर यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की ,’ दहा वर्षांपासून शहर विकासाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी आपण काम करत असून महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून तरीही सरकारकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध झालेला आहे. शहरातील गल्लीपासून रस्त्यापर्यंत विकास कामे सुरू आहेत. माजी नगरसेविका दिपाली बारस्कर यांचे विकासाबाबतचे नियोजन कौतुकास्पद आहे.’
आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर , माजी नगरसेवक सतीश बारस्कर , योगेश ठुबे यांच्यासह परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते . दिपाली बारस्कर यांनी देखील यावेळी बोलताना सदर कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांचे सहकार्य लाभलेले आहे असे म्हटलेले आहे.