नगर शहरात फसवणुकीचा एक अद्भुत प्रकार समोर आलेला असून टेलिग्रामवर टास्क पूर्ण करण्याचे आमिष दाखवत चास येथील एका महिलेची 23 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे. 26 डिसेंबर पासून एक जानेवारीपर्यंत ही घटना घडलेली आहे. सायबर पोलिसात दोन टेलिग्राम आयडी धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादी महिला ही चास येथील रहिवासी असून टेलिग्राम खात्यावर तिला काजोल गालिब आणि इंद्रा नुयी या वेगवेगळ्या टेलिग्राम आयडीवरून मेसेज आलेले होते, त्यामध्ये ऑनलाईन टास्क पूर्ण केले असता आर्थिक आमिष दाखवण्यात आले. काही दिवस महिलेने काम केल्यानंतर अकाउंटला पैसे जमा झाले हे पाहिल्यानंतर महिलेला समोरील व्यक्तीवर विश्वास बसला आणि त्यानंतर अधिक कामासाठी त्यांना गुंतवणुकीची मागणी करण्यात आली.
फिर्यादी महिला यांच्याकडून 26 डिसेंबरपासून एक जानेवारीपर्यंत सुमारे 23 लाख 35 हजार रुपयांची रक्कम आरोपींनी लुबाडली आणि त्यानंतर महिलेस प्रतिसाद देणे बंद केले. काही दिवसात आरोपींनी फिर्यादी महिला यांना ब्लॉक देखील करून टाकले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अहिल्यानगर सायबर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेने फिर्याद दिलेली असून दोन टेलिग्राम धारकांच्या विरोधात बीएनएस आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदराम पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.