देशविदेशातील पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गोव्याला सध्या ग्रहण लागलेले असून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री असलेले भाजप नेते प्रमोद सावंत यांनी नेहमीप्रमाणे असा काही प्रकार असल्याचे स्पष्टपणे फेटाळले असले तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोव्यातील हॉटेल्स चक्क ओस पडल्याचे दिसून येत आहे. गोव्याच्या प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याऐवजी असे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवरच एफआयआर रजिस्टर करण्याचे उद्योग सुरू केल्याने आगामी काळातही परिस्थितीत काही बदल होईल अशी आशा राहिलेली नाही.
गेल्या काही वर्षांपासून गोव्यातील नागरिकांचे वर्तन देखील पर्यटकांसंदर्भात बदललेले दिसून येत असून स्थानिक आणि पर्यटक असा संघर्ष सध्या गोव्यात निर्माण झालेला आहे पर्यटकांना पार्किंगपासून तर टॅक्सीपर्यंत सर्वच ठिकाणी वेठीस धरले जात असल्याने नक्की आलोत तरी कशासाठी असा प्रश्न पर्यटकांना पडतो आणि त्यामुळे पर्यटकांनी आता गोव्याकडे पाठच फिरवली आहे. गोव्याचे संपूर्ण अर्थकारण पर्यटकांच्या भरवशावर चालत असल्याने आगामी काळात गोव्यात मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.
गोव्यातील साधारण वस्तूंचे दर हे इतर राज्याच्या तुलनेत दुप्पट तिप्पटपेक्षा जास्त असून गोव्यात नक्कीच जायचे तरी कशासाठी असा प्रश्न पर्यटकांना यामुळे गोव्यात गेल्यानंतर पडतो. सर्व ठिकाणी हॉटेलचे दर तुलना करून अनेक लोक प्रवास करतात मात्र गोव्यातील हॉटेलचे दर हे श्रीलंका व्हिएतनाम थायलंड यांच्यापेक्षा देखील जास्त दिसून येतात तसेच इतर सुविधांच्या बाबतीत देखील गोव्याच्या तुलनेत हे देश खूप पुढे आहेत. पर्यटकांना कुठल्या सुविधा द्यायच्या याविषयी देखील गोव्यातील हॉटेल्स प्रचंड उदासीन असून सकाळच्या वेळी गरम पाण्यापासून तर पार्किंगपर्यंत कुठलीही सुविधा न देता केवळ मनमानी पद्धतीने लुटण्यात गोवेकर सध्या व्यस्त आहेत.
गोव्यातील वाहतूक पोलिसांचे वर्तन हे देखील नागरिकांच्या संतापाचे कारण ठरत असून बाहेरच्या गाडीचे पासिंग पाहिल्यानंतर गोव्यातील ट्राफिक पोलिसांकडून पर्यटकांची अडवणूक करण्यात येते. स्थानिक गाडी असेल तर पोलिसांकडून नरमाईचे धोरण अवलंबले जाते मात्र बाहेरची गाडी दिसली की गोव्यातील पोलीस अधिकच कार्यक्षम होतात आणि त्यातून पर्यटक म्हणून आलेल्या व्यक्तींना आर्थिक लुटीला सामोरे जावे लागते. कितीही कायदे पाळले तरी काही ना काही शोधून पर्यटकांना अक्षरशः गोव्यात लुटण्यात येते असेच अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गोव्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात कोलमडलेली असून टॅक्सीचालकांच्या मनमानीमुळे किरकोळ अंतराचा प्रवास करण्यासाठी देखील मोठी रक्कम मोजावी लागते. गोव्यात नक्की पर्यटनासाठी आलो आहोत की फक्त पैसे उधळण्यासाठी असा प्रश्न यामुळे पर्यटकांना पडतो. जेवणाचे दर हे देखील इतर देशांच्या तुलनेत गगनाला भिडलेले आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत गोव्यातील पर्यटनाची हवा उतरत चाललेली असून त्यासाठी सर्वस्वी गोव्याचे नागरिक आणि प्रशासन जबाबदार आहे.