बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झाले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना , ‘ सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता ? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला होता, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घृण हत्या केली. संतोष देशमुख पुढं जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता पण त्याची हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही,यामुळे सर्वांनी मिळून देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे.
कितीही वेळ होऊद्या देशमुख यांना तुमच्या मनातून जाऊ देऊ नका. ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही आलात. आरोपींना मोक्का लागला पाहिजे, ३०२ मध्ये गेले पाहिजेत. ते बिन भाड्याच्या खोलीत गेले पाहिजेत. त्यांचे नातेवाईत सुद्धा तिथे गेले नाहीत पाहिजे. त्यांचा ‘तेरे नाम’ झाला पाहिजे, सलमान खान सारखी यांची अवस्था झाली पाहिजे.
देशमुख यांच्या पत्नीला नोकरी लागली पाहिजे. नोकरी लावली तर कुणीही तडजोडीला त्यांच्याकडे गेले नाही पाहिजे, हा रोष लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. सरकार सरपंच यांच्याबाबीत पॉझिटीव्ह आहे. आज सायंकाळी देशमुख यांचं कुटुंब देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, सर्वांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी रहा, या प्रकरणात उज्ज्वल निकम यांना केस कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करत आहे ,’ असेही ते पुढे म्हणाले.
आतापर्यंत या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एक जण अजूनही फरार आहे. १४ जूनला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून धनंजय मुंडे यांनी तीन कोटी रूपये मागितले आणि त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते , असा देखील दावा सुरेश धस यांनी केलेला आहे.