बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सरपंच परिषदेकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजप आमदार सुरेश धस हे देखील सहभागी झाले आहेत.
आमदार सुरेश धस यांनी यावेळी बोलताना , ‘ सरपंच संतोष देशमुख यांचा गुन्हा काय होता ? गावातील एका दलित वॉचमनला मारहाण होताना तो रोखायला गेला होता, खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला म्हणून त्याची निर्घृण हत्या केली. संतोष देशमुख पुढं जाऊन जिल्हा परिषद सदस्यही झाला असता पण त्याची हत्या केल्यामुळे कोणताही सरपंच समाजसेवेचं काम करण्यासाठी पुढे येणार नाही,यामुळे सर्वांनी मिळून देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल याची काळजी घ्यायला पाहिजे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पंकजा मुंडे या गप्प राहत असल्याचा आरोप सातत्याने होत असून त्यांनी अखेर बोलताना,’ तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि मला माहीत नाही ना यामध्ये कोण-कोण आरोपी आहेत. त्यामुळे मी कोणाचं कसं नाव घेऊ ? कोणाचं नाव घेणं योग्य आहे का, हे तुम्ही मला सांगा. एखादी निर्घृण हत्या, एखादा पाशवी बलात्कार याला प्रत्यक्षदर्शी असेल तर तो हे होऊ देईल का ? मी सांगतेय की, कोणीही असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्याला कुठल्याही बाबतीत सूट मिळाली नाही पाहिजे.’
पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की ‘ मुख्यमंत्र्यांनी तपासाबाबत सकारात्मक उत्तर दिलं आहे. ही घटना घडली तेव्हा, त्याच्या दोन दिवस आधी आणि नंतरही राज्यभरात कितीतरी घटना घडल्या आहेत, त्याकडे कोणीतरी लक्ष देतंय का ? संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता, त्याच्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघून मला काय वाटतंय हे तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं मोठं प्रदर्शन मांडण्याची आवश्यकता नाही. फक्त यातून काहीतरी वेगळं मिळवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये,’ असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं आहे.