महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला शहरात मोठ्या रोषाचा सामना करावा लागत असून शहरातील झोपडी कॅन्टीन परिसरात असाच एक दुर्दैवी अनुभव अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ आणि कर्मचारी दत्ता जाधव यांना आलेला आहे. अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेल्यानंतर एका व्यक्तीने आदित्य बल्लाळ आणि कर्मचारी दत्ता जाधव यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार मंगळवारी संध्याकाळी मॅक केअर हॉस्पिटलजवळ घडलेला आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याचे समजताच महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी तात्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. आगामी काळात अतिक्रमण मोहीम राबवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी आयुक्तांकडून करण्यात आली आहे .
नगर शहरात गेल्या महिन्यापासून अतिक्रमण हटवण्याची मोहीम वेगवेगळ्या भागात सुरू असून कारवाई करताना पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला दुर्दैवाने सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई ही एका ठराविक राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून करण्यात येत असल्याची देखील चर्चा असून विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची लीड आणि अतिक्रमण विभागाची कारवाई यात कनेक्शन असल्याचा आरोप अनेक जणांकडून खाजगीत केला जात आहे. एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्यासाठी जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
महापालिकेच्या फ्लेक्समुक्त नगरचे नगरकरांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत केले जात असून अतिक्रमण विभागाच्या पथकानेच ही कारवाई करत शहरातील अनेक फ्लेक्स काढून शहरवासीयांना मोठा दिलासा दिलेला आहे. निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर या फ्लेक्सबाजानी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी फ्लेक्सबाजीच्या विरोधात कंबर कसली आहे मात्र अतिक्रमण काढण्याच्या कारवाईस मात्र नेहमीप्रमाणे विरोध होत आहे.