नगर जिल्ह्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून मुलीने आई वडिलांच्या मनाविरोधात प्रेमविवाह केला म्हणून विवाहितेच्या नातेवाईकांनी जावयाला दुचाकीवरून घरी नेऊन बेदम मारहाण करत झाडाला बांधून ठेवलेले होते. विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनंतर आई वडील आणि चुलत्याविरोधात अकोले पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , फिर्यादीने गावातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केला आणि त्यानंतर ती नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात निघून गेली. काही दिवसांपूर्वी ती सासू-सासऱ्यांना भेटण्यासाठी गावी आलेली होती त्यावेळी संध्याकाळी सातच्या सुमारास तिचा पती बाहेरून जाऊन येतो म्हणून निघाला त्यानंतर विवाहितेच्या वडिलांनी साडेसात वाजता मोबाईलवर फोन करून आमच्या मुलीला आमच्या घरी आणून सोडा अशी धमकी दिली.
महिलेच्या वडिलांनी ,’ तिला एकदा आमच्या घरी सोडा, आम्ही तिला आणि तिच्या नवऱ्याला बिल्डिंगवरून ढकलून देऊन मारून टाकू ,’ असे देखील म्हटले त्यानंतर विवाहितेच्या सासऱ्यांनी सासूनी आणि नातेवाईकांनी महिलेच्या पतीचा शोध सुरू केला त्यावेळी आपल्या पतीला पकडून नेलेले असल्याची माहिती विवाहित महिलेला समजली.
विवाहित महिलेने त्यानंतर तिच्या वडिलांना फोन करून माझ्या पतीला सोडून द्या अशी विनंती केली मात्र समोरून स्पष्टपणे नकार मिळाल्यानंतर विवाहितेला पोलिसांकडे जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. महिलेच्या पतीला मारहाण होत असतानाच पोलीस पोहोचले आणि सासऱ्याच्या तावडीतून जावयाची सुटका केली.