अवघ्या काही दिवसांवर संक्रांत आलेली असून पतंग शौकिनांमध्ये पूर्वी इतका उत्साह आता दिसून येत नसला तरी काही प्रमाणात नगर शहरात पतंग पाहायला मिळत आहेत. नायलॉन मांजाच्या विरोधात नगरकर देखील एकवटलेले असून महापालिका प्रशासन देखील कारवाईसाठी सतर्क झाले आहे. नायलॉन मांजाचे विक्रेते आणि वापरकर्ते यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिलेले आहेत.
नायलॉन मांजा ची विक्री , साठवणूक आणि वापरणे या तीनही बाबींमध्ये जर संबंधित व्यक्ती दोषी आढळून आला तर त्याच्या विरोधात दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. दोषी व्यक्तींना 25 हजार रुपयांचा दंड आणि कायदेशीर कारवाई यास सामोरे जावे लागेल असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
नायलॉन तथा चायनीज मांजा हा मनुष्यप्राणी आणि पक्षी यांच्यासाठी अत्यंत घातक असून आतापर्यंत अनेक प्राणी पक्षी आणि मनुष्यांचा देखील अपघात होऊन मृत्यू झालेला आहे. पतंगबाजांना नगर शहरात पतंग उडवण्यासच मज्जाव करण्यात यावा अशी मागणी शहरात जोर पकडत असून पतंगाच्या पाठीमागे पळून लहान मुलांचे देखील अपघात झालेले आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे पतंग हा प्रकार शहरात बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.